लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकाविणाऱ्या परराज्यातील चोरट्यांच्या टोळीला खडकी पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून ३० मोबाइल संच जप्त करण्यात आले. या टोळीने पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांकडील मोबाइल संच हिसकाविण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहेत.

अभिषेक राजकुमार महातो (वय २२, रा. बिहार), दिनेश राजकुमार नोनिया (वय १८, रा. कटियारा, बिहार), रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय १९, रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड), राजेश धर्मपाल नोनिया (वय १८, रा. बर्धमान, पश्चिम बंगाल), सचिन सुखदेव कुमार (वय २०, रा. साहेबगंज, झारखंड), उजीर सलीम शेख (वय १९, रा. कटियारा, बिहार), अमीर नूर शेख (वय १९, रा. झारखंड), सुमीत मुन्ना महातोकुमार (वय १९, रा. झारखंड), कुणाल रतन महातो (वय २१, रा. कटियारा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई-पुणे रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावरील रोकड परराज्यातील चोरटे लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती सोमवारी (१४ एप्रिल) खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले. चौकशीत चोरट्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरट्यांकडून आठ लाख रुपये किंमतीचे ३० मोबाइल संच जप्त करण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, संदेश निकाळजे, अश्विनी कांबळे, आशिष पवार, सुधाकर राठोड अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रवीण गव्हाणे, तनुजा पाटील यांनी ही कारवाई केली.

झपटपट पैसे कमाविण्यासाठी गुन्हे

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमधील आहेत. आरोपी रेल्वेने पुण्यात आले होते. पुण्यात मजुरी करताना त्यांची ओळख झाली. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्यांनी नागरिकांकडील मोबाइल हिसकावून नेण्याचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून आठ लाख रुपयांचे ३० मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.