रेल्वे स्थानक, बाजारपेठा, एसटी स्थानक परिसरात मोबाइल चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी वावरणारे चोरटे नागरिकांचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यांच्या खिशातील मोबाइल लांबवून पसार होतात. तर काहींचे मोबाईल जागरुकतेअभावी गहाळदेखील होतात. शहरातील ३९ पोलीस ठाण्यांत दररोज मोबाइल चोरी किंवा गहाळ झाल्याच्या किमान दोनशे ते तीनशे तक्रारी दाखल होत आहेत. या शिवाय अनेकजण तक्रारही करत नाहीत. मोबाइल  चोरीला गेल्यानंतर त्याचा छडा लावणे तसे अवघड आहे. पोलिसांकडून मोबाईल चोरीचा छडा लावण्याचे प्रमाणही तसे कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज किमान दोन ते चार मोबाईल संच चोरीला जातात. काहींचे मोबाइल गहाळ होतात. अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडून मालमत्ता गहाळ (प्रॉपर्टी मिसिंग) म्हणून अदखलपात्र गुन्ह्य़ांच्या स्वरूपात नोंदवल्या जातात. पोलिसांवर गंभीर गुन्ह्य़ांचा तपास, दैनंदिन तक्रारी, कायदा-सुव्यवस्था सांभाळणे अशा कामांची जबाबदारी असते. महत्त्वाचे सण, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त अशा स्वरूपाचा अतिरिक्त बंदोबस्त पोलिसांना पार पाडावा लागतो. त्यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्य़ांचा तपास करण्यास पोलिसांना वेळ नसतो. किंबहुना दररोज चोरीला जाणाऱ्या किंवा गहाळ होणाऱ्या मोबाईलचा छडा लावण्यात वेळ खर्ची पडला तर पोलिसांचे मूळ काम बाजूला पडण्याची देखील शक्यता आहे.

रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी भुरटय़ा चोरटय़ांचा वावर असतो. बऱ्याचदा खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोबाइल चोरीचे गुन्हे उघडकीस येतात. चोरलेल्या मोबाईलचा छडा लावण्यासाठी तांत्रिक तपास महत्त्वाचा ठरतो. मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून तंत्रिक तपास सुरू केला जातो. तांत्रिक तपासात एखाद्या मोबाईलचे लोकेशन (निश्चित जागा) शोधायचे असेल तर त्याला पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी लागते. त्यासाठी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे सहकार्यदेखील महत्त्वाचे असते. एखादा मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्यात दुसरे सिमकार्ड टाकण्यात आले तरच त्याची माहिती कंपन्यांकडून मिळते. त्यासाठी मोबाइल  कंपन्यांना पोलीस अधिकाऱ्याने पत्र द्यावे लागते. त्यानंतरच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोबाइलची माहिती देतात, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांवर पडणारा कामाचा ताण विचारात घेऊन फक्त मोबाईल चोरीवर लक्ष केंद्रित करणे पोलिसांना शक्य होत नाही. पोलिसांना गंभीर गुन्ह्य़ांचा तपासदेखील करावा लागतो.

  • मोबाइल चोरीची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची गरज
  • मोबाइल चोरीत मुंबई, कर्नाटकातील टोळ्या सक्रिय
  • रेल्वे स्थानकावर मोबाइल चोरणारा अटकेत