लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यास समर्थ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच लाख नऊ हजार रुपयांचे २९ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. चोरट्याने मार्केटयार्ड, पुणे स्टेशन, स्वारगेट, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात परिसरात मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
कुंदनकुमार अर्जुन महातो (वय २५, मूळ रा. साहेबगंज, झारखंड, सध्या रा. अंधेरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महातो याने शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल चोरले असून, तो मुंबईहून शहरात मोबाइल चोरीचे गुन्हे करण्यासाठी येत असे. पुण्यातून चोरलेले मोबाइल संच तो झारखंडमध्ये विकणार होता, असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा… पुण्यात घर घेणे महागले! परवडणाऱ्या घरांच्या विक्रीतही झाली घट
गणेश पेठेतील मासळी बाजारात एक जण थांबला असून, त्याच्याकडे चोरलेले मोबाइल संच असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस हवालदार रोहीदास वाघेरे, जितेंद्र पवार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत २९ मोबाइल संच सापडले. चौकशीत त्याने पुणे शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल संच चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा… पुणे शहर ‘राष्ट्रवादी’चा शरद पवारांना पाठिंबा
सहायक आयुक्त अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय भोसले, रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रहिम शेख, कल्याण बाेराडे आदींनी ही कारवाई केली.