पिंपरी-चिंचवड परिसरातील सोन साखळी, मोबाइल चोरी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल १५९ मोबाइल,सोने चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. यापैकी ८१ मोबाईल आणि सोने चांदीचे दागिने त्यांच्या मूळ मालकांना भोसरी आणि चिंचवड पोलिसांनी परत करत नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. असा ऐकूण तब्बल १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यात आई आणि मुलाचा समावेश असून ते मंदिर परिसरातील जमिनीत चोरीचे मोबाईल पुरून ठेवायचे.
पिंपरी-चिंचवड परिसरात मोबाइल चोर आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या चिंचवड आणि भोसरी पोलिसांनी आवळल्या आहेत. यात आई आणि मुलाचा सहभाग असून लखन शर्मा आणि मंगल शर्मा अशी दोघांची नावे आहेत. मोबाइल चोरून घरातील डब्बा किंवा मंदिर परिसरातील जमिनीत पुरून ठेवायचे. ग्राहक मिळाल्यानंतर ते कमी किंमतीत मोबाइल विकत असत. याप्रकरणी दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासोबत लाल्या भिसे याला देखील बेड्या ठोकल्या आहेत.
तर भोसरी येथील दुसऱ्या प्रकरणात मोबाइलच्या आकर्षणामुळे चक्क अल्पवयीन मुलाने मोबाइलचे दुकानच फोडले. तो इयत्ता ९ वीत शिक्षण घेत आहे. मोबाइलचे आकर्षण असल्याने फिल्मी स्टाईल मोबाइलचे दुकान फोडत दुकानातील ४५ नवे मोबाईल लंपास केले होते. त्यातील दोन मोबाइल वापरत असताना संबंधित मुलाला भोसरी पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या पकडले. याप्रकरणी अधिक तपास केला असता त्याला १० वीतील मुलाने चोरी करण्यात मार्गदर्शन केले असल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना समज देण्यात आली आहे. चिंचवड आणि भोसरी पोलिसांनी या दोन्ही कामगिरी केली असून संबंधित मूळ मालकांना तब्बल ८१ मोबाईल आणि दोन लाख ३९ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने परत केले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक कठोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.