लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पादचाऱ्यांचे मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांनी मोबाइल हिसकावण्याचे सहा गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सहा मोबाइल संच आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
आदित्य प्रशांत साळवे (वय १९, जयविजय चौक, बोपोडी), सचिन अशोक केंगार (वय १९, रा. कमळाबाई बहिरट चौक, सम्राटनगर, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या बरोबर असलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी बाहेरगावाहून येणारे प्रवासी तसेच पादचारी नागरिकांचे मोबाइल संच हिसकावून नेले होते. या प्रकरणी शिवाजीनगर, खडक, विश्रामबाग, मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी साळवे, केंगार चोरलेले मोबाइल संच विक्री करण्यासाठी बुधवार पेठेतील तपकीर गल्लीत असलेल्या मोबाइल मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अभिनव लडकत यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. तपासात आरोपींच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.
आणखी वाचा- चिंचवडमधील तारांगण प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
पोलीस उपायुक्त अमाेल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, तापकीर, अजय जाधव, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, नीलेश साबळे, अमोल पवार आदींनी ही कारवाई केली.