‘युटीएस अ‍ॅप’ची सुविधा; दरात ५.५ टक्क्य़ांची सूट

१२ ऑक्टोबरपासून पुणे रेल्वेच्या सर्वच स्थानकांसाठी अनारक्षित तिकिटे आता मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून ‘युटीएस अ‍ॅप’ची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून काढलेल्या रेल्वे तिकिटांवर ५.५ टक्क्य़ांची सूटही देण्यात येणार आहे.

वर्षभरापूर्वी पुणे विभागातील काही स्थानकांसाठी मोबाइलवर अनारक्षित तिकिटांची सुविधा देण्यात आली होती. विशेषत: पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड या मार्गावरील प्रवाशांकडून या सुविधेला चांगला प्रतिसाद देण्यात येत आहे. त्यामुळे १२ ऑक्टोबरपासून ही सुविधा सर्व स्थानकांसाठी देण्यात येणार आहे. या निमित्ताने रोकडरहित आणि कागदरहित व्यवहाराच्या दृष्टीने पुणे रेल्वेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोणत्याही गाडीचे अनारक्षित तिकीट काढण्यासाठी आता प्रवाशांना स्थानकावरील तिकीट खिडकीसमोरील रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही.

पुणे रेल्वेच्या कोणत्याही स्थानकापासून आणि लोहमार्गापासून दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रवाशाला मोबाइलच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे स्थानकाकडे निघताना रस्त्यातही तिकीट काढता येऊ शकते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून प्रवाशाला मोबाइलमध्ये ‘युटीएस अ‍ॅप’ डाउनलोड  करावे.

अ‍ॅपवरून तिकीट कसे काढाल?

‘युटीएस अ‍ॅप’ मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी प्रवाशाला मोबाइल क्रमांक, नाव, लिंग, जन्म दिनांक, राहत असलेले शहर आदी माहिती भरावी लागेल. त्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल. रकमेचा भरणा आर-वॉलेटच्या माध्यमातून करावा लागेल. आर-वॉलेटला युटीएस काउंटर किंवा ऑनलाइन पद्धतीने आयआरसीटीसीच्या कॉमन पेमेंट गेटवेच्या utsonmobile.indian.rail.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रिचार्ज करता येईल. अ‍ॅपवर तिकीट काढल्यानंतर प्रवासादरम्यान ‘शो तिकीट’ या पर्यायात तिकीट तपासणिसांना तिकीट दाखविता येईल.