आम्हाला स.प. महाविद्यालयामध्येच प्रवेश हवा, या एकाच मुद्दय़ावर हटून बसलेले पालक, विद्यार्थी आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये या वर्षी डाळ न शिजलेल्या विद्यार्थी संघटनांनी स.प. महाविद्यालयामध्ये बुधवारी गोंधळ घातला. या वेळी सहायक शिक्षण उपसंचालकांना कार्यकर्त्यांनी कोंडून ठेवले. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी राजीनामा दिला आहे.
स.प. महाविद्यालयाने मंजूर प्रवेश क्षमतेबाहेर ९६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. हे प्रवेश अनियमित असून त्याला मान्यता देण्यात येणार नाही, अशी भूमिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थी संघटना, नगरसेवक यांनी महाविद्यालयामध्ये गर्दी केली. त्या वेळी उपप्राचार्य सुरेखा डांगे यांनी प्रवेश अनियमित असल्याचे पालकांना सांगितले. अनियमित प्रवेश रद्द करण्यासाठी महाविद्यालयामध्ये गेलेल्या सहायक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, उपप्राचार्य डांगे आणि प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेले काही पत्रकार यांना कार्यकर्त्यांनी उपप्राचार्याच्या कक्षामध्ये कोंडून ठेवले. याबाबत संध्याकाळी उशिरा शि.प्र. मंडळीचे सचिव अनंत माटे, ओव्हाळ आणि संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, याबाबत अजूनही कोणताही ठाम तोडगा निघाला नसून शि. प्र. मंडळी, महाविद्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक होणार आहे.
प्राचार्याचा राजीनामा
स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी बुधवारी सकाळी शि.प्र. मंडळी संस्थेकडे आपला राजीनामा दिला. शि.प्र. मंडळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन पालकांना दिले होते. मात्र, हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर संस्थेने हात झटकून याचे सर्व खापर प्राचार्य डॉ. शेठ यांच्यावर फोडले आहे, असे डॉ. शेठ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्राचार्य डॉ. शेठ यांनी राजीनामा दिल्याचे कळताच महाविद्यालयामध्ये गोंधळ सुरू झाला. ‘विद्यार्थ्यांच्या बाजूने लढणाऱ्या प्राचार्याना परत आणा,’ अशी घोषणाबाजी महाविद्यालयाच्या आवारामध्ये सुरू झाली.
काय घडले?
अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होतात. प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेले प्राधान्यक्रम आणि त्यांची गुणवत्ता या आधारे तीन प्रवेश फेऱ्या घेऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालये देण्यात आली. मात्र, काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न घेता संघटनांना हाताशी धरून प्रवेशासाठी स.प. महाविद्यालयाशी संपर्क साधला. शि.प्र. मंडळी आणि महाविद्यालयाकडून पालकांना प्रवेश देण्याचे आश्वासन देण्यात येत होते. मात्र, त्याच वेळी माहविद्यालयाने पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवेश क्षमता वाढवून देण्यात येऊ नये, असे पत्र शिक्षण विभागाकडे पाठवले. त्यानंतर प्राचार्य डॉ. शेठ आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण सचिवांची मुंबईत भेट घेऊन प्रवेश मंजूर करण्याची मागणी केली. त्या वेळी ‘नियमानुसार स.प. महाविद्यालयाचे प्रवेश मंजूर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.’ अशा आशयाचे पत्र शिक्षण सचिवांनी स.प. महाविद्यालयाला दिले. मात्र, महाविद्यालयाने केलेल्या नियमबाह्य़ प्रवेशाला मंजुरी देण्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नकार देण्यात आला. तरीही शि. प्र. मंडळीच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, त्यांच्याकडून संस्थेने शुल्कही जमा केले.
कोणाचे काय म्हणणे –
‘आम्ही गेले तीन महिने महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी खेटे घालत आहोत. महाविद्यालयाने आम्हाला आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यात आली. मात्र, आता हे प्रवेश नियमबाह्य़ असल्याचे सांगितले जात आहे. हे महाविद्यालय घराजवळ आहे, त्यामुळे इथे प्रवेश हवा आहे. याच महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे.’
– सुरेश पवार, पालक
‘विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी भूमिका आमचीही आहे. मात्र, महाविद्यालयाचे आताचे प्रवेश नियमबाह्य़ आहेत. या प्रकरणी काही मध्यम मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, याबाबत गुरुवारी शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांच्याशी बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल.’
– बाळासाहेब ओव्हाळ, सहायक शिक्षण उपसंचालक
‘आम्ही शुल्क घेतले आहे, म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. त्याला मान्यता मिळण्याबाबत शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करू. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. डॉ. शेठ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, हा संस्थेचा अंतर्गत विषय आहे. त्यामध्ये संघटनानी लक्ष घालू नये.’
– अनंत माटे, सचिव शि.प्र. मंडळी