दगडफेक तसेच वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या टोळी विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी टोळीप्रमुख यश दत्ता हेळेकर, (वय २१), शुभम शिवाजी खंडागळे (वय २१), विनायक गणेश कापडे (वय २०), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २३, सर्व रा. एसआरए इमारत, विमाननगर) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील ८३ टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात २० टोळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

हेळेकर आणि साथीदारांनी चतु:शृंगी परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. हेळेकर आणि साथीदारां विरोधात खुनाचा प्रयत्न, लूट, वाहन चोरी, खंडणी, मारहाण असे गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही हेळेकर आणि साथीदारांच्या वर्तणुकीत फरक पडत नव्हता. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गुन्हे शाखेतील निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी हेळेकर टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हेळेकर टोळी विरोधात मोक्का कारवाईचे आदेश दिले.

Story img Loader