दुपारच्या वेळी वाघोलीत अचानकपणे भूकंपाचे धक्के जाणवू लागले आणि एक इमारत बघता बघता जमीनदोस्त झाली. सगळीकडे दगडमातीचे ढीग, लोकांचा आक्रोश.. थोडय़ाच वेळात ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’चे (एनडीआरएफ) सुसज्ज पथक तिथे पोहोचले आणि मदतकार्याला वेगाने सुरुवात झाली.
या प्रसंगातील इमारत कोसळणे आणि पुढील मदतकार्य जरी खरेखुरे भासणारे होते, तरी प्रत्यक्षात भूकंप झालाच नव्हता! लातूर भूकंपाला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जैन संघटना आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी वाघोली येथे भूकंपाच्या ‘मॉक ड्रिल’चे आयोजन करण्यात आले होते. एनडीआरएफच्या पाचव्या क्रमांकाच्या बटालियनने या वेळी सादरीकरण केले.
भूकंपात कोसळलेल्या इमारतीची पाहणी जवानांद्वारे कशी केली जाते, त्यासाठी हेलिकॉप्टर आणि कॅमेऱ्यासह हवेत उडू शकणाऱ्या उपकरणाचा कसा उपयोग होतो, प्रथम इमारतीतील वीज, पाणी आणि गॅसचा पुरवठा बंद करून आत शिरकाव कसा करतात या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. अर्धवट कोसळलेल्या इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर अडकलेल्यांना बाहेर कसे काढले जाते हे दाखवताना जवानांनी ‘रिव्हर क्रॉसिंग’, ‘स्टमक रॅपलिंग’, ‘पिगी बॅकिंग’ अशा जीवरक्षक कृतींची श्वास रोखून धरायला लावणारी प्रात्यक्षिके सादर केली. जखमींवर प्राथमिक उपचार कसे होतात, अवयवांत तीक्ष्ण वस्तू घुसल्यावर काय करतात, अशा गोष्टींची प्रात्यक्षिकेही या वेळी झाली.
एनडीआरएफचे कमांडंट अलोक अवस्थी, संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा या वेळी उपस्थित होते. या ठिकाणी एनडीआरएफ वापरत असलेल्या जीवशोधक व जीवरक्षक उपकरणांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा