उकडीचे मोदक तयार करणं सर्वानाच जमतं असं नाही. या मोदकांचं गुळाचं सारण जमावं लागतं. पारीही जमावी लागते. पाकळ्या तयार करणं हे देखील मोठय़ा कौशल्याचं काम. असे हजारो मोदक तेही साच्याचा वा कोणत्याही यंत्राचा वापर न करता तयार होतात, ‘गोडबोले यांचे हातवळणीचे उकडीचे मोदक’ या उद्योगात..

गणेशोत्सवाचं आणि मोदकांचं नातं अतूट आहे. गणेशोत्सवात विशेषत: श्रीगणेशतचुर्थीला उकडीचे मोदक घराघरात होतात. अनेक घरी तळणीचे मोदक करण्याचीही पद्धत आहे. अर्थात उकडीचे मोदक तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. हा तसा अवघड पदार्थ आहे. त्यामुळेच त्याची सगळी तंत्र नीट जमली तरच उकडीचे मोदक जमतात. उकडीचे मोदक हे कोकणाचं खास वैशिष्टय़. कोकणातला हा वारसा घेऊन पुण्यात आलेल्या ज्योती गोडबोले यांना एका अगदी छोटय़ा प्रसंगातून उकडीचे मोदक करून त्यांची विक्री करण्याची कल्पना सुचली आणि गेल्या दहा वर्षांत उकडीच्या मोदकविक्रीत त्यांनी जे काही यश मिळवलं आहे त्याची कथा सर्वाना समजावी अशीच आहे.

दहा वर्षांत गोडबोले यांनी या व्यवसायात इतका जम बसवला आहे की ‘गोडबोले यांचे हातवळीचे उकडीचे मोदक’ हा हजारो घरातला परवलीचा शब्द झाला आहे. गोडबोले यांच्या सदाशिव पेठेतील राहत्या घरात हे मोदक तयार होत असले तरी ते तयार करण्याची पद्धत आणि सर्व प्रक्रिया बघितली की त्याला कोणीही मोदकांचा कारखानाच म्हणेल, असा हा सगळा उद्योग आहे. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात या घरात शब्दश: हजारो मोदक तयार होतात आणि त्यामुळे ज्योती गोडबोले यांच्या घराला कारखान्याचं स्वरूप आलेलं असतं. विशेष म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी जे हजारो मोदक पुरवावे लागतात ते मोदक तयार करण्याचं काम आदल्या दिवशी मध्यरात्री सुरू होतं आणि ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत अखंडपणे सुरू असतं. पुढेही रोज किमान दहा-बारा तास मोदक तयार करण्याचं काम चालतं.

गोडबोले यांच्या हातवळीच्या मोदकाची गोष्ट इथे संपत नाही, तर या उद्योगाचं मुख्य वैशिष्टय़ हे की हे मोदक वर्षभर अगदी रोज उपलब्ध असतात. तुम्हाला जेव्हा उकडीचे मोदक खायची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही हे मोदक आणून त्यांचा आस्वाद घेऊ शकता. ही गोष्ट आहे साधारण दहा वर्षांपूर्वीची. ज्योती गोडबोले यांच्या घरी कोणीतरी उकडीचे मोदक आणून दिले होते. अर्थात ते विकतचे मोदक होते. ते मोदक बघितल्यानंतर घरातले सगळेचजण त्यांना म्हणाले, तुझे मोदक एवढे चांगले होतात तर तूच तयार करून बघ की मोदक. ते आपल्याला विक्रीसाठी कुठेतरी देता येतील. हा एवढा एक छोटा प्रसंग एका नव्या मोदक उद्योगाला चालना देणारा ठरला. ज्योती गोडबोले यांनी मनात घेतलं आणि मोदक तयार करून ते काही ठिकाणी द्यायला सुरुवात केली. त्या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील राजापूरच्या. त्यामुळे उकडीचे मोदक तयार करण्याचं कसब अंगी होतंच. पुण्यात संधी मिळाली आणि मग वर्षभर उकडीचे मोदक ही त्यांची संकल्पना चांगलीच यशस्वी झाली. अगदी छोटय़ा स्वरूपात हा व्यवसाय सुरू झाला आणि उत्तम प्रतीच्या मोदकांमुळे तो चांगलाच विस्तारला. पुण्यात खाद्यपदार्थ विक्रीच्या अनेक दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये, भोजनगृहांमध्ये आणि मंगल कार्यालयांमध्ये गोडबोले यांचे उकडीचे मोदक मिळतात. शिवाय गोडबोले यांच्या घरी येऊन मोदक घेऊन जाणाऱ्यांची संख्याही शेकडय़ांच्या घरात आहे.

गणेशोत्सवात जे हजारो मोदक तयार करावे लागतात त्यासाठीची तयारी गोडबोले यांच्या घरी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. पिठीसाठी आंबेमोहेर, बासमती तांदळाची खरेदी हा या तयारीचा मुख्य भाग. ही पिठी तयार करण्याचं कामही त्या घरघंटीमध्ये करतात. त्यामुळे उत्तम प्रतीची पिठी मिळते. मोदक चांगले व्हायचे असतील तर पिठी उत्तम लागते. हे काम अशोक गोडबोले करतात. शिवाय चांगल्या प्रतीचा गूळ, नारळ यांचीही खरेदी आधीच केली जाते. त्याबरोबरच मोठय़ा प्रमाणावर वेलची खरेदी करून पूड करून ठेवण्याचं कामही आधीच झालेलं असतं.

या मोदकांचं वैशिष्टय़ं हे की ते तयार करण्यासाठी साचा वा यंत्राचा वापर केला जात नाही. फक्त नारळ खोवणं आणि सारण तयार करणं ही कामं यंत्रावर होतात. पण प्रत्यक्ष मोदक मात्र हातांनीच तयार केले जातात. शेकडो मोदक इथे तयार होत असतात आणि ते साच्यातून तयार केल्यासारखे अगदी एकसारखे असतात. हेच खरं या कामातलं कौशल्य. वर्षभर या मोदकांना मागणी असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील आठ-दहा जणी गोडबोले यांच्या कुटुंबातच वर्षभर या कामासाठी रहायला असतात. मोदक तयार करण्याच्या कामातून अशाप्रकारे आठ-दहा कुटुंबांना रोजगारही उपलब्ध होतो. पांढरी शुभ्र पातळ पारी, भरगच्च सारण, मोठा आकार आणि अठरा ते वीस पाकळ्या असा हा मोदक पंधरा रुपयांना एक या दराने दिला जातो. वर्षभर चालणारा हा उद्योग आवर्जून पाहावा.

कुठे आहे

ज्योती गोडबोले : श्रीकौशिक सोसायटी, दुसरा मजला, निंबाळकर तालीम चौक, सुजाता कोल्ड्रिंक्सच्या वर

Story img Loader