मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या दिल्लीतील चोवीस वर्षीय तरुणीवर चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने पुण्यातील खराडी परिसरात अत्याचार झाल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली. अटक केलेले सर्वजण मूळचे आसाममधील आहेत. पीडित तरुणीला सिगारेटचे चटके देण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि तो पुणे पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला होता.
पीडित तरुणी ही दिल्लीत मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असून तिची फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील एकाची ओळख झाली होती. त्या तरुणाने तिला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखविले. दहा मार्च रोजी ती पुण्यात आली. चित्रपटात काम देण्यासाठी ऑडिशन द्यावी लागेल, असे त्याने तिला सांगितले. सुरुवातीला दोन दिवस तिला चांगली वागणूक देण्यात आली. त्यानंतर तरुणाने तिची दुसऱ्या एकाशी ओळख करुन दिली. ‘हे आमचे साहेब आहेत’, असे तिला सांगण्यात आले.
तरुणीकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली आणि सिगारेटचे चटके देण्यात आले. त्यानंतर एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची सुटका झाली आणि २२ मार्च रोजी ती दिल्लीस गेली. तेथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले, असे पीडित तरुणीने दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती तिने दिल्लीतील कोटला मुबारक पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून ज्या तरुणाची ओळख झाली त्याच्या आणि त्याच्या साथीदाराविरोधात दक्षिण दिल्लीतील कोटला मुबारक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दक्षिण दिल्ली पोलीस उपायुक्त प्रेम नाथ म्हणाले की, तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा