कोकणात फिरायला जाण्यासाठी पर्यटकांना चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. या भागातील पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) खास व्हॉल्व्हो बसेस तयार करून घेतल्या असून, त्यात शौचालय, वाय फाय, ओव्हन, फ्रीज अशा अनेक सोयींचा समावेश आहे. या बसेस पुणे आणि मुंबईहून कोकणात जाण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
एमटीडीसीतर्फे कोकणात अनेक पर्यटनस्थळे विकसित करण्यात आली आहेत. तिथे पर्यटकांची गर्दीसुद्धा वाढ लागली आहे. पर्यटकांच्या तीनचार दिवसांच्या आरामदायी सहली आयोजित करण्यासाठी आता पुढाकार घेण्यात आला आहे. त्यात बसमध्येच काही सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सहलीत कोकणातील तारकर्ली, गणपतीपुळे, श्रीवर्धन, कुणकेश्वर, वेळणेश्वर अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळे तसेच, फारशी प्रसिद्धीच्या झोतात नसलेली पर्यटनस्थळांना पर्यटकांना नेण्यात येईल. या सहलींसाठी दोन बसेस पुण्याहून तर तीन बसेस मुंबईहून सुटतील. त्याची पूर्वतयारी म्हणून २६ ते २८ फेब्रुवारी या काळात एक सहल आयोजित करण्यात आली आहे. त्यात माध्यमांचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर्स, ट्रव्हल एजंट्स यांचा समावेश असेल.
प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था असलेल्या अशा बसेस राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे एमटीडीसीकडून सांगण्यात आले. त्या चालविण्यासाठी खासगी टूर ऑपरेटर्सचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही एमटीडीसीतर्फे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern and hi fi buses in mtdc fleet