शिवकाळात आणि पेशवाईच्या कालखंडात राजव्यवहारासाठी वापरली गेलेली आणि सुमारे नऊशे वर्षांची परंपरा असलेली मोडी लिपी ‘मोडीत’ निघू नये यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (१ मे) एकाच वेळी चार शहरांमध्ये सुंदर मोडी हस्ताक्षर आणि लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मोडी लिपीच्या प्रचारासाठी जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे मुंबई, पुणे, नगर आणि नाशिक येथे सकाळी दहा ते अकरा आणि साडेअकरा ते साडेबारा या वेळात ही स्पर्धा होणार आहे. मोडी लिपीच्या प्रचारार्थ अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त ही स्पर्धा होणार आहे. नव्या पिढीमध्ये मोडी लिपीविषयी जागृती व्हावी आणि अधिकाधिक संख्येने युवक या लिपीकडे वळावेत, या उद्देशाने सातत्याने उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्यातूनच ही स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे राजेश खिलारी यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी काळ्या शाईचा वापर करणे आवश्यक आहे. चारही केंद्रांवरील दोन्ही स्पर्धा गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी परेश जोशी (मो. क्र. ९८८११०४३७९), संतोष यादव (मो. क्र. ९३७२१५५४५५) किंवा अरिवद साने (मो. क्र. ९८५०७४६१७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.