व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मोडी लिपीचे प्रशिक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मय पाटणकर, पुणे</strong>

ऐतिहासिक मोडी लिपीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला आहे. मोडी लिपीचे प्रशिक्षण व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातूनही दिले जाऊ लागले असून, नाशिकचे मोडी लिपी मार्गदर्शक सोज्वल साळी यांनी मोडी लिपी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे शिकवण्याचा प्रयोग केला आहे.

मोडी लिपीला मोठा इतिहास आहे. त्यामुळे मोडी लिपीमध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मोडी लिपीच्या संवर्धनासह कागदपत्रांतील माहिती जाणून घेण्यासाठी तरुणाई मोडी लिपी शिकण्याकडे वळू लागली आहे. मोडी शिकू इच्छिणाऱ्या नोकरदार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गात जाऊन शिकण्यासाठी वेळ मिळत नसल्याने सोज्वल साळी यांनी शक्कल लढवत मोडी प्रशिक्षणासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर सुरू केला. अल्पावधीतच त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात मोडी लिपीतील बाराखडी, जोडाक्षरे, पत्रवाचन या विषयी मार्गदर्शन केले जाते.

‘व्हॉट्स अ‍ॅपद्वारे प्रशिक्षणाचे आतापर्यंत दहा वर्ग झाले. दोन महिन्यांचा हा वर्ग असतो. अनेकांना वेळ मिळत नसल्याने ते व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मोडी लिपीचे प्रशिक्षण घेतात. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे वर्ग सुरू केला तेव्हा पहिल्यांदा चारच विद्यार्थी होते. मात्र, नंतर प्रतिसाद वाढ जाऊन ही संख्या ७०च्या घरात पोहोचली. दुरेघी मांडणीसारखे काही प्रकार न समजल्यास व्हॉट्स अ‍ॅप कॉल करून त्या द्वारेही मार्गदर्शन केले जाते. मोडी अक्षरांचे फोटो व्हॉट्स अ‍ॅपवर पोस्ट केले जातात. यूटय़ूब मोडी मार्गदर्शनाचे व्हिडिओ आहेत किंवा पुस्तकेही उपलब्ध आहेत. मात्र, अक्षरांचे आकार नेमके काढायचे कसे किंवा काही चूक झाल्यास कोणाला विचारायचे असे प्रश्न प्रशिक्षणार्थीना पडतात. मोडीमध्ये बरेचसे शब्द फारसी भाषेतील आहेत. बाहमनी काळ, शिवकाळ, पेशवे काळ, आंग्ल काळ या कालखंडानुसार काही बदल झाले. त्यामुळे त्या विषयीही  मार्गदर्शन केले जाते,’ अशी माहिती साळी यांनी दिली.

परदेशातही उत्सुकता

नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या मराठीजनांनाही मोडी शिकण्यात रस आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मोडी शिकवली जात असल्याने त्यांनाही सहजगत्या मोडी शिकता येते. मस्कतसारख्या देशांतील अनेकांनी या माध्यमातून मोडीचे शिक्षण घेतल्याचेही साळी यांनी सांगितले.