काँग्रेस कोणत्याच मुद्यावर भाजपशी लढू शकत नाही, अशी देशातील परिस्थिती आहे. राहुल गांधी हे मोदींबरोबर चर्चा करू शकत नसल्यामुळे चर्चेचे आव्हान कपिल सिब्बल, चिदंबरम वगैरे नेते देत आहेत; पण त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही पुरे आहोत. काँग्रेसने आधी त्यांचा कप्तान ठरवावा. म्हणजे दोन कप्तानांमध्ये नाणेफेक होईल. इतर खेळाडूंनी नाणेफेकीला जायचे नसते, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते, खासदार शाहनवाझ हुसैन यांनी मंगळवारी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.
हुसैन आणि खासदार राजीवप्रताप रुडी मंगळवारी पुण्यात आले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत दोघांनी काँग्रेसवर जोरदार टीका करतानाच दिल्ली, राजस्थानसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला. मोदींनी समोरासमोर चर्चेला यावे असे आव्हान काँग्रेसचे नेते देत आहेत. प्रत्यक्षात राहुल गांधी अशी चर्चा मोदींबरोबर करू शकत नसल्यामुळे अन्य नेते मोदींना आव्हान देत आहेत. मात्र, त्यांना आम्ही देखील पुरे आहोत, असे सांगून हुसैन म्हणाले, की काँग्रेसने आधी त्यांचा कप्तान जाहीर करावा. म्हणजे दोन्ही कप्तानांमध्ये सामन्याची नाणेफेक होईल आणि नाणेफेकीच्या वेळी इतर खेळाडू जात नाहीत. ती फक्त दोन कप्तानच करतात.
राजकीय भाषेतील कठोर टीका आम्ही समजू शकतो. मात्र पंतप्रधान आणि सोनियांकडून आता ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे, ती दुर्भाग्यपूर्ण आहे, असेही हुसैन म्हणाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन काँग्रेसने फक्त आठ ते नऊ दिवसांचे ठेवले असून भारताच्या इतिहासात इतक्या अल्प काळाचे अधिवेशन आजवर झालेले नाही. देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार काँग्रेसने गमावल्याचेच हे उदाहरण आहे, असे राजीवप्रताप रुडी यांनी सांगितले.
पाटणास्फोटांना बिहार सरकारच जबाबदार
देशातील सर्वात खतरनाक अतिरेकी यासीन भटकळ याला बिहारच्या सीमेवर पकडल्यानंतर पुणे, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, दि ल्ली येथील पोलिसांनी तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेश सरकारने चौकशीसाठी त्याची मागणी केली. मात्र, नीतीशकुमार यांच्या बिहार सरकारने मात्र त्याची चौकशी केली नाही आणि चौकशीची मागणीही केली नाही. जर त्याच्याकडे त्या वेळीच चौकशी केली असती, तर इंडियन मुजाहिद्दीनने जे स्फोट मोदी यांच्या सभेत घडवले, त्या कटाची माहिती मिळू शकली असती. त्यामुळे त्या स्फोटांना बिहार सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राजीवप्रताप रुडी यांनी पत्रकार परिषदेत केला.

Story img Loader