चिंचवड हे स्थान पवित्र व जागृत आहे. येथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केल्या. माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत, अशी प्रार्थना करीत, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, मनपा आयुक्त शेखर सिंह, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, देवराज डहाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
भागवत म्हणाले की,
आपल्या सर्वांची मांडणी संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे संघर्ष हा धर्म आहे. संघर्ष हा पूर्वीपासून चालू आहे. तो आजूनही थांबलेला नाही. तो करण्यासाठी शरीर, मन, बुद्धी चांगली असायला हवी. धर्मासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे.
चिंचवड हे स्थान पवित्र आणि जागृत आहे. इथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. त्यांचे दर्शन मला घेता आले हे माझे सौभाग्य आहे, मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते, अशा भावना भागवत यांनी व्यक्त केल्या.
चिंचवडला चांगला इतिहास आहे. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांचा पदस्पर्श या भूमीला झाला आहे. दरवर्षी हा सोहळा करण्याचे प्रयोजन काय आहे. या सोहळ्याचे बाह्यरूप चांगले झाले पाहिजे. धर्म अतिवादाला थारा देत नाही. धर्माला तोल असतो. जग, सृष्टी चालवण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी द्यायचे असते. धर्मासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असे ते म्हणाले.
हेही वाचा…पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, मुकुंदनगर भागातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा
सृष्टी धर्माच्या आधारे चालते. सत्य, करुणा, सुचिता, तपस हे धर्माचे चार स्तंभ आहेत, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांची उन्नती करणारा हा धर्म आहे. त्यासाठी भारत जगला, वाढला पाहिजे. माणसाने स्वतःशी, इतरांशी आणि सृष्टीशी चांगलं वागले पाहिजे. करोनानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी संख्या खूप वाढली आहे. त्या काळात लोकांनी इतरांचे दुःख ओळखून त्यावर काम करण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली.
भारतातील सनातन परंपरा अनेक अडचणी पार करून जशीच्या तशी उभी आहे. याचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकतो. महापुरुषांचे चरित्र स्मरून आपण त्यांच्याप्रमाणे थोडे थोडे वागले पाहिजे. हा सोहळा आपण या विचाराने साजरा करावा. धर्म जागरणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.