पिंपरी : पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा विचार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलून दाखवला, तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतही आणला पाहिजे, असे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‘तुम्ही मनुस्मृतीचे दहन करा, आम्ही तुमच्यासोबत येऊ’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त पिंपरीतील एच.ए. मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते. भागवत यांच्या भाषणाचा संदर्भ देत ॲड. आंबेडकर म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. तो कोणाचाही गुलाम नाही, हा विचार तुम्ही स्वीकारला आहे का? ज्या व्यवस्थेने, विचारांनी देशाला गुलाम केले, त्यांना तुम्ही बदलणार आहात का, हे आधी स्पष्ट करावे. तुम्ही अजूनही त्याच मनुस्मृतीत खितपत पडला आहात.
पापक्षालन करण्याचे सांगत भागवत यांनी बदलती भूमिका घेतली आहे. १९४६ आणि १९५० मध्ये संघाने घेतलेली भूमिका आणि आता भागवतांनी घेतलेली भूमिका यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. संविधानातून नवीन व्यवस्था आणली तरी आम्ही पुन्हा मनुस्मृती आणू, अशी घोषणा तेव्हा संघाने केली होती. आता जुन्या समाजव्यवस्थेने अन्याय केला, ही आमच्याकडून झालेली चूक आहे, अशी कबुली आताचे सरसंघचालक देत आहेत, हा ७५ वर्षांंमधील बदल आहे. आमच्याकडून पाप झाले, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली, हे धम्म मेळाव्याचे यश आहे. जो अनेक वर्षे गुलाम म्हणून राहिला, तो आता गुलाम म्हणून राहू इच्छित नाही. देशांत विचारांचा बदल होऊ लागला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.