महापालिका प्रशासन आणि सर्वसाधारण सभेने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखडय़ामध्ये अत्यंत त्रुटी आहेत. यामध्ये गैरप्रकार झाले असून यातील सहभागी काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी रविवारी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराच्या जुन्या विकास आराखडय़ाबाबत राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसमधूनही नाराजीचा सूर येत आहे. शहरातील टेकडय़ा वाचवाव्यात ही माझी पहिल्यापासून भूमिका असून, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरू असा इशारा आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिला. या विकास आराखडय़ामध्ये गैरप्रकार झाले असल्याने आपण त्यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
महापालिकेमध्ये काँग्रेस सत्तेत असताना ही भूमिका पक्षविरोधी नाही का, असे विचारले असता, मोहन जोशी म्हणाले, विकास आराखडा चर्चेला आला तेव्हा मंजूर करण्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवक आणि आमदारांची बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती, मात्र अशी कोणतीच बैठक झालेली नसल्यामुळे विकास आराखडय़ासंदर्भात पक्षाची कोणताही भूमिका ठरली नाही.
 मुळशीचे पाणी पुण्याला
शहराची वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आगामी ३० वर्षांचे नियोजन करण्यासाठी मुळशी धरणातून ४ ते ५ टीएमसी पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला द्यावे, अशी मागणी विधान परिषदेमध्ये केली असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली. ऊर्जामंत्री अजित पवार यांनी याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रसंगी वीजनिर्मितीसाठीचे पाणी कमी करून ते पिण्याला द्यावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan joshi demand to cm to take action on guilty congress corporators in dp
Show comments