सर्व क्षेत्रात वावर असलेल्या पत्रकारांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्यावरच ते लिहीत असतात. पत्रकारांनी वाइटावर प्रहार करतानाच चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले पाहिजे. सकारात्मक बाजू समाजापुढे आणली पाहिजे, असे मत पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचा महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला, तेव्हा त्या बोलत होत्या. संघाचे अध्यक्ष जयंत जाधव, सचिव रोहित आठवले, कामगार नेते व नगरसेवक कैलास कदम, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे उपस्थित होते. या वेळी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे ‘माध्यमांचे बदलते स्वरूप आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान झाले. चक्रे यांच्या कामाचा आढावा घेत महापौरांनी त्यांचे कौतुक केले. महाराव म्हणाले, समाजात चांगल्या-वाईट गोष्टी आहेत. चांगले आत्मसात करून वाईट टाकून दिले पाहिजे. अन्यायाविरुद्ध घाव घालणे हीच खरी पत्रकारिता आहे. पत्रकारांचे काम प्रबोधन, जनजागृती व मनोरंजन करण्याचे आहे. माध्यमे बदलली तरी मूळ दृष्टिकोन बदलेला नाही. उत्तम पत्रकारितेला मरण नाही. अश्विनी सातव यांनी सूत्रसंचालन केले. अमोल काकडे यांनी मानपत्राचे वाचन केले. चैत्राली राजापूरकर यांनी आभार मानले.