पुणे : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले मोखा चक्रीवादळ रविवारी दुपारी बांगलादेश आणि म्यानमार किनारपट्टीजवळ जाऊन धडकले. त्याचा परिणाम म्हणून सुमारे २०० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी तसेच मुसळधार पावसाने दोन्ही किनारपट्टय़ांवर अक्षरश: थैमान घातले.
‘मोखा’ या चक्रीवादळाने सुमारे चार चक्रीवादळांची तीव्रता धारण करत बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टय़ांवर धडक दिल्याची माहिती रविवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. ‘मोखा’ चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे दोन्ही किनारपट्टय़ांच्या प्रदेशात प्रचंड पाऊस, पूर तसेच भूस्खलनाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा जागतिक हवामानशास्त्र संघटनेकडून देण्यात आला आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे वाऱ्यांचा वेग ताशी २१० किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता असून त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळीही सुमारे १२ फुटांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
रविवारी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलेले मोखा हे मागील दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे बांगलादेशच्या हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी २००७ मध्ये ‘सिद्र’ हे चक्रीवादळ बांगलादेशला धडकणारे एक शक्तिशाली चक्रीवादळ ठरले होते. नैऋत्य मोसमी पावसापूर्वी पूर्व बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचा एकत्रित विचार केला असता १९८२ नंतर आलेले हे तिसरे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ‘फणी’ तर २०२० मध्ये ‘अंफन’ या चक्रीवादळांची बंगालच्या उपसागरात उत्पत्ती झाली होती आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले.
आधीची वादळे
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात उत्पत्ती झालेल्या चक्रीवादळांमध्ये ‘फणी’, ‘अंफन’, ‘गोनू’ यांच्यानंतर आता शक्तिशाली चक्रीवादळ म्हणून ‘मोखा’ चक्रीवादळाचा समावेश करण्यात आला आहे.