पत्रकार असल्याच्या बतावणीने मुंढवा भागातील एका व्यापाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळी विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी योगेश प्रकाश नागपुरे (वय ३५), प्रमोद अजित साळुंखे (वय २५, रा. खराडी), वाजीद अश्पाक सय्यद (वय २५, क्रांतीपार्क, खराडी), मंगेश बाळासाहेब तांबे (वय २८, रा. खराडकर पार्क, खराडी), लक्ष्मणसिंग उर्फ हनुमंता छत्तरसिंग तंवर (वय ३५, रा. हेवन बिल्डींग, मांजरी) आणि एका महिलेच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार योगेश नागपुरे आणि महिलेला अद्याप अटक करण्यात आली नाही. नागपुरेच्या विरोधात खडक, मुंढवा, हडपसर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रमोद साळुंखेने पत्रकार असल्याची बतावणी एका व्यापाऱ्याकडे केली होती. व्यापाऱ्याचे मुंढवा भागात गोदाम आहे. गोदामात गुटख्याचा साठा असल्याचा आरोप त्याने केला होता. गुटखा विक्रीतून भरपूर पैसे मिळवल्याचे सांगून साळुंखेने व्यापाऱ्याकडे खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही, तर जिवे मारू, अशी धमकी दिली होती. याबाबत व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा- पुणे: भटके-विमुक्त जाती-जमातींचे ११ डिसेंबरला राज्यस्तरीय अधिवेशन

या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक निरीक्षक समीर करपे यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. सहायक आयुक्त बजरंग देसाई तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mokka action against a gang of fake journalists pune print news dpj