सिंहगड रस्ता भागात दहीहंडी उत्सवात एका तरुणावर गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पोलिसांनी गुंड टोळीतील सराईतासह आठ अल्पवयीन मुलांच्या विरोधात मोक्का कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> घरासमोर शेण पडल्यावरुन दोन गटात हाणामारी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी चेतन पांडुरंग ढेबे (वय २५), अनुराग राजू चांदणे (वय २०), वैभव शिवाजी साबळे (वय २०), रोहन दत्ता जाधव (वय २०, सर्व रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), सुनील धारासिंग पवार (वय १९, रा. रायकर मळा, धायरी), बाळू धोंडिबा ढेबे (वय २४, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत, पर्वती पायथा), रमेश धाकलू कचरे (वय १९, रा. कात्रज गाव), साहिल बबन उघडे यांच्यासह आठ अल्पवयीन मुलांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. चेतन ढेबे टोळीप्रमुख आहे. ढेबे याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ढेबे याच्या टोळीत अल्पवयीन मुले आहेत.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवासाठी फूल बाजार बहरला; पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम

गेल्या महिन्यात दहीहंडी उत्सवात एका तरुणावर कोयत्याने वार करुन ढेबे आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. ढेबे याच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमोरे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, मीनाक्षी महाडिक, स्मिता चव्हाण यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली. पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ९६ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader