पुणे : घोरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांविरुद्ध अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

एन्जाॅय ग्रुपचा म्होरक्या अमित म्हस्कू अवचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर), सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंज पेठ), लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसप्पा उर्फ बसवराज स्वामी (वय २७, दोघे रा. भेकराईनगर, हडपसर) अशी माेक्का कारवाई केलेल्या सराइतांची नावे आहेत. अवचरे टोळीप्रमुख आहे. २०१३ मध्ये शंकरशेठ रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये कुणाल पोळ याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून विशाल उर्फ जंगल्या सातपुते आणि साथीदारांनी खून केला होता. वर्चस्वाच्या वादातून पोळ याचा खून करण्यात आला होता. लोणीकंद भागातील कोलवडी रस्त्यावर २९ ऑगस्ट रोजी अवचरे आणि साथीदार सातपुते याचा खून करण्यासाठी दबा धरून बसले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा >>>पुण्यात ‘लोकसत्ता’च्या ‘जनस्वास्थ्य’चे आज प्रकाशन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून  अवचरेसह साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. एन्जाॅय ग्रुपची घोरपडे पेठ, लोणीकंद भागात दहशत असल्याने पोलिसांनी अवचरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलिसांनी तयार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार केला. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.