पुणे: तरुणावर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाईनंतर सहा महिने फरारी झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सौरभ तिमप्पा धनगर (वय २४, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गणेश संजय पोळ (वय २९) हे त्यांचा मुलगा रोनिकला दुचाकीवरुन घेऊन घरी जात होते. त्यावेळी मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर, आकाश पंडित आणि साहिल वाघमारे यांनी त्यांना अडवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फायटर, बांबुची काठी, लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तेव्हापासून सौरभ धनगर फरार झाला होता. पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार बडे, भोकरे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस पथकाने आरोपीला कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या पथकाने केली.