पुणे : ओळखीतील महिलेने बोलणे बंद केल्याने एकाने महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली तसेच महिलेचा मोबाइल संच हिसकावून नेला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. .
सुहास राधाकृष्ण नवले (वय ३६, रा. शंकर महाराज सोसायटी, गंगाधाम रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला आणि सुहास नवले एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून महिलेने सुहासशी बोलणे बंद केले होते. त्याच्याशी संपर्क साधणे बंद केले होते. त्यामुळे सुहास तिच्यावर चिडला होता. सुहासने महिलेला रस्त्यात गाठले. तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेकडील मोबाइल संच हिसकावून नेला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.