लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘केंद्र सरकारने जनधन योजनेची खाती सुरू केली, त्या वेळी राहुलबाबा म्हणाले होते, ‘खाती सुरू केली, पैसे कुठे आहेत?’ आज एकाच दिवशी, एकाच वेळी १० लाख नागरिकांच्या खात्यात पैसे जमा झाले, हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा,’ असा टोला लगावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर शनिवारी निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतील २० लाख लाभार्थ्यांच्या घरांचे मंजुरीपत्र वितरण आणि १० लाख नागरिकांना पहिला हप्ता वितरण शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजनेच्या अभियानाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे आणि पोस्टरचे प्रकाशनही शहा यांच्या हस्ते झाले.
‘प्रत्येकाला घर, वीज, पाच किलो धान्य देणे हीच मोदी यांची विकसित भारताची संकल्पना आहे. कोणत्याही पंतप्रधानाने १० वर्षांत ६० लाख लोकांना घर, धान्य देण्याचे काम केलेले नाही. पंतप्रधान आवास योजनेमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुढची दिवाळी लाभार्थी त्यांच्या हक्काच्या घरात साजरी करतील. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून अनेक क्षेत्रात विकासाची कामे सुरू असून, यामुळेच सत्ता स्थापनेची संधी मतदारांनी दिली,’ असे शहा यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते, की माझा घर झाले पाहिजे. केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले असून, त्याच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रात असलेले महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे.’
ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रास्ताविकामध्ये योजनेची व्याप्ती सांगितली. मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला होता. मात्र ग्रामविकास विभागाने ४५ दिवसांमध्येच हे आव्हान पूर्ण केल्याचे गोरे म्हणाले. कल्पना साठे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.
‘खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणती, हे जनतेने दाखवून दिले’
विधानसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणती, हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिल्याची टिप्पणी करून अमित शहा यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता चिमटा काढला. ‘खरे कोण, खोटे कोण याचा निर्णय निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मतदारांनी केला आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध आहे,’ असे शहा म्हणाले.