पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आलिशान ‘पोर्श’ मोटारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात शरण आलेला आरोपी अरुणकुमार सिंग याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे तपासातून पुढे आले आहे. तर, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल यांनी साक्षीदारांच्या मार्फत दिलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये हस्तगत करण्यात येत आहे.
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर अरुणकुमार देवनाथ सिंग (वय ४७, रा. विमाननगर) शरण आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने सिंग याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा – कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
सिंग याने वापरलेला आयफोन पंचनाम्यासाठी जप्त करण्यात आलेला असून तो सायबर तज्ज्ञांकडे देण्यात आलेला आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधून पैसे पाठविण्यात आले त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत, असे या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी गुरुवारी न्यायालयामध्ये सांगितले.
सिंगच्या पोलीस कोठडीत वाढ
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आलेले आहेत. मित्तल याने अल्पवयीन मुलाच्या ऐवजी स्वतःच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी केलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत त्याच्या बँक खात्याबाबत आरोपीकडे सखोल तपास करावयाचा आहे. सिंग हा ससून रुग्णालयात आल्यानंतर तो आणखी कोणाकोणाच्या संर्पकात होता. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अटक आरोपी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला सांगितले होते का याबाबत सिंगकडे तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे. तसेच मोटारचालक अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांनी साक्षीदारांच्या मार्फत दिलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये अद्यापही हस्तगत झालेले नाहीत. त्याबाबत सिंग याच्याकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सिंग याच्या कोठडीत १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.