पावसाने ओढ घेतल्याने राज्यात दुष्काळ आहे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, अशी भाषा राजकीय नेत्यांकडून होत असताना त्यांचे अनुयायी मात्र ऐकण्याच्या स्थितीत नाही, हे चित्र पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्येही आहे. उंच दहीहंडी लावून कोटय़वधींचा चुराडा करण्यासाठी शहरातील काही धनदांडगी मंडळी पूर्ण तयारीत आहेत. गर्दी खेचण्यासाठी आमंत्रित केलेल्या तारकांना लाखोंची ‘सुपारी’ देऊन उत्सव साजरा करण्यात तीव्र चढाओढ आहे.
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. अलीकडे त्याला पूर्णपणे बाजारी स्वरूप येऊ लागले आहे. यंदाही संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन हेच उत्सवाचे वैशिष्टय़ आहे. राजकीय हेतू ठेवून उत्सवाच्या नावाखाली वातावरण निर्मिती करण्याकडे संयोजकांचा कल अधिक आहे. लाखो रुपयांचे मानधन देऊन तारकांना या कार्यक्रमासाठी आणले जाते, त्यामागे गर्दी जमवणे हाच हेतू आहे. यंदाही अशा कार्यक्रमांची रेलचेल शहरभरात आहे. पिंपळे सौदागर, भोसरी, पिंपरीगाव, चिंचवड, निगडी आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणातील दहीहंडय़ा असून गल्लीबोळात छोटय़ा दहीहंडय़ा होत आहेत. पिंपळे सौदागरमध्ये ‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया मुख्य आकर्षण आहे, तर प्रतिस्पर्धी गटाच्या कार्यक्रमात ‘सिंघम’ फेम काजल आगरवाल तसेच श्रुती मराठे, सायली भगत या तारका झळकणार आहेत. निगडीत मृणाल दुधानिस, सिया पाटील, प्रियांका वामन सहभागी होणार आहेत. असेच तारकायुध्द अन्य ठिकाणी दिसते. या कार्यक्रमांसाठी रस्ते अडवण्यात येऊन पाण्याचे उंच फवारे मारण्याची परंपरा आहे. नागरिकांना, वाहनस्वारांना अतिउत्साही कार्यकर्त्यांचा त्रास आहे. पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. मात्र, या कशाचेही आयोजकांना घेणं-देणं नाही, अशी परिस्थिती आहे. भोसरीत आतापर्यंत सर्वाधिक चुरस होती. निवडणुकीनंतर आजी-माजी आमदारांच्या गटातील संघर्षांचे वातावरण टोकाला गेले असताना, दहीहंडीच्या निमित्ताने ते राजकारण पुन्हा उफाळून येण्याचे चिन्ह होते. पीएमपी चौकात दहीहंडी कोणाची, या विषयावरून वादाची शक्यता होती. मात्र, एका गटाने नमते घेतल्याने हा विषय तूर्त थंडावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा