नैर्ऋत्य मान्सूनने रडतखडत का होईना बुधवारी अखेर महाराष्ट्रात प्रवेश केला. पण ही केवळ कोकणासाठी शुभवार्ता आहे, कारण तो किनारी भागातच रत्नागिरीपर्यंत पुढे सरकला असून, राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्यास त्याला किमान चार दिवस लागणार आहेत. अरबी समुद्रात सध्या ‘नानौक’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाची हालचाल किती वेगाने होते, यावर मान्सूनचे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील आगमन अवलंबून असेल.
मान्सूनच्या आगमनाला या वर्षी एकूणच उशीर झाला. तो गेल्या शुक्रवारी, ६ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे बुधवारी त्याने महाराष्ट्राच्या किनारी भागात प्रवेश केला. कर्नाटक किनारपट्टी, गोवा तसेच, महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून दाखल झाला. बुधवारी दिवसभरात अलिबाग, रत्नागिरी, पणजी येथे पावसाच्या काही सरी बरसल्या. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातूनही मान्सून पुढे सरकला. त्याने संपूर्ण ईशान्य भारत व्यापला. हवामानाची आताची स्थिती पाहता, मान्सून येत्या दोन दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण व्यापण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण वगळता अंतर्गत भागात पोहोचण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
चक्रीवादळाचा परिणाम
अरबी समुद्रात सध्या निर्माण झालेल्या नानौक चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. हे चक्रीवादळ सध्या मध्य अरबी समुद्रावर मुंबईपासून ६७० किलोमीटर अंतरावर, तर वेरावळपासून (गुजरात) ५९० किलोमीटर अंतरावर आहे. ते भारताच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ओमान किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम म्हणूनच मान्सून किनारी भागात पुढे सरकला. मात्र, याच वादळामुळे मान्सून महाराष्ट्र व कर्नाटकच्या अंतर्गत भागात दाखल होण्यास अनुकूल स्थिती नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
पुढे काय?
मान्सूनची पुढील प्रगती अरबी समुद्रातील चक्रीवादळावर अवलंबून असेल. या वादळी तीव्रता वाढत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत बाष्पही मोठय़ा प्रमाणात जमा झाले आहे. हे वादळ वेगाने पुढे सरकले, तर पुढील तीन-चार दिवसांत मान्सून अंतर्गत भागात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल. मात्र, हे वादळ समुद्रावर जास्त काळ रेंगाळळे, तर मान्सून किनारपट्टी सोडून आत येण्यास आठवडाभर वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता चक्रीवादळाच्या हालचालीवर पुढील गोष्टी अवलंबून असतील, असे डॉ. खोले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा