भारतात यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला असला तरी एल-निनोच्या कालावधीबाबत अनिश्चितता असल्यामुळे मान्सूनच्या कालावधीत त्याचा किती प्रभाव असेल यावर पावसाचे भवितव्य ठरेल. जून महिन्यामध्ये येणारा सुधारित अंदाजापर्यंत ही स्थिती स्पष्ट होणार असल्याने तो अंदाज अचूक असेल, असे मत भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘ मान्सून अंदाज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. राजीवन हे बोलत होते. याप्रसंगी आयआयटीएमचे सल्लागार डॉ. जीवनप्रसाद कुलकर्णी, पत्रकार संघाचे सरचिटणीस सुनीत भावे यावेळी उपस्थित होते.
डॉ. राजीवन म्हणाले की, मान्सूनच्या वाऱ्यावर प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव असतो. प्रशांत महासागरामध्ये पाण्याचे तापमान वाढल्यामुळे एल निनोची स्थिती निर्माण होते. या तापमानात ०.५ अंशांनी वाढ झाली तरी त्याचा प्रभाव जाणवतो. सध्या प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात दोन अंशानी वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात एल निनोची परिस्थती निर्माण होण्याची शक्यता ही ७५ टक्के आहे. ही गोष्ट चिंता वाढवणारी आहे. मात्र, एल निनोच्या कालावधीमध्ये मोठी अनिश्चितता असते. ही परिस्थती एक वर्षे राहू शकते. किंवा दोन महिन्यांतही पूर्ववत होऊ शकते. १९९७ साली एल निनोचा प्रभाव असूनही चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मान्सूनचा जूनमधील येणारा अंदाज हा अचूक असेल.
सध्या स्टॅटेस्टिकल आणि डायनॅमिकल या दोन मॉडेलनुसार देशात पावसाचा अंदाज दिला जातो. डायनॅमिक मॉडेलमध्ये कमी क्षेत्रावरील हवामानाचा व तापमानचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. पुढील दोन वर्षांत डायनॅमिकल मॉडेलवर भर देण्यात येणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशात ९३ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या प्राथमिक अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जून महिन्यात हवामान विभागाकडून देण्यात येणारा अंदाज हा विभागवार असून त्यामध्ये अधिक अचूकता असेल, असे डॉ. राजीवन यांनी स्पष्ट केले.
‘उत्तरेतील थंड वारे दक्षिणेकडे सरकल्याने गारपीट’
जमिनीपासून वर साधारण दोन किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडून पूर्वेकडे थंड वारे वाहत असतात. पश्चिमेकडून वाहणारे हे वारे साधारण उत्तरेकडील ३० अंश रेखावृत्ताच्या वरील भागात वाहतात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये हे वारे महाराष्ट्रापर्यंत येत आहेत. त्यावेळी दक्षिण भागात, कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्प ओढून घेतले जाते. हवेच्या वरच्या थरात असलेल्या थंड हवेमुळे गारांची निर्मिती होऊन गेल्या दोन वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात गारपीट होत आहे, अशी माहिती आयआयटीएमचे सल्लागार डॉ. जीवनप्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

Story img Loader