नैर्ऋत्य मान्सून शुक्रवारी अंदमान-निकोबार बेटे, अंदमान समुद्र तसेच, बंगालच्या उपसागरात काही भागात दाखल झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये पाच-सहा दिवसांपूर्वी निर्माण झालेले ‘महासेन’ वादळ बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकून आता पूर्णपणे विरून गेले आहे. त्यानंतर शुक्रवारी मान्सून अंदमानात दाखल झाला. तो तिथे सामान्यत: २० मे रोजी पोहोचतो. या वेळी तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. त्याचे भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळातील आगमन लांबणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, तो बंगालच्या उपसागरात पुढे सरकण्यास अनुकूल स्थती निर्माण झाली आहे. दरम्यान, राजस्थान व विदर्भात तापमान ४५ अंशाच्या पुढे गेलेले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही भागात गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Story img Loader