नैर्ऋत्य मान्सून शुक्रवारी (६ जून) केरळच्या किनाऱ्यावर पोहोचण्यास अनुकूल वातावरण असल्याचे गुरुवारी हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. केरळसह तामिळनाडूचा काही भाग, मालदीव-कॉमोरीन परिसर तसेच, अरबी समुद्रातही तो शुक्रवारी पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, त्या-त्या वेळच्या स्थितीनुसार तो लवकर किंवा विलंबाने पोहोचतो. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.
मान्सून ५ जून रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागातर्फे गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला होता. गेल्या तीन-चार दिवसांत त्याच्या पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि तो या आठवडय़ाच्या सुरुवातीला केरळच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला. त्याने श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापला. सध्या केरळ ते कर्नाटक या राज्यांलगत अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचबरोबर मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने वाऱ्यांचा प्रवाससुद्धा अनुकूल आहे. त्याचा परिमाण म्हणून शुक्रवारी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले.
दरम्यान, देशाच्या अनेक भागात गेले दोन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. त्यात केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, ओरिसा, पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग, झारखंड, आसाम, ईशान्येकडील राज्ये, आंध्र प्रदेशचा किनारी भाग यांचा समावेश आहे. येत्या शनिवापर्यंत मान्सून ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होईल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात कधी?
मान्सूनच्या महाराष्ट्रातील प्रवासाला आणखी काही दिवस लागतील. तो केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करतो. मात्र, त्या त्या वेळच्या स्थितीनुसार ही तारीख मागे-पुढे होते. सध्या मान्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रातही नेहमीच्या वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. मान्सून सामान्यत: ६-७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा