पुणे : अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा सुरूच असून, कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्रासह आता विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागांत पावसाने जोर धरला आहे. आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस आणखी आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात मुक्कामी राहणार असल्याचा अंदाज आहे. शनिवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील हिंगोलीत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात काही भागांत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागांमध्ये दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत सध्या द्रोणीय स्थिती कायम आहे. यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प महाराष्ट्राच्या भूभागाकडे येत आहे. त्यातून गेल्या आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. दक्षिण कोकणात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्येही मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबई परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पुढील चार ते पाच दिवस काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या भागासह सध्या गुजरात, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा,आसाम, मिझोराम, तमिळनाडू आदी भागांतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे.
शनिवारी सकाळपासून महाबळेश्वर, वर्धा आदी भागात शंभरहून अधिकल मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर आदी भागांत जोरदार सरी कोसळल्या. गेल्या चोवीस तासांत सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण आदी भागांत १०० ते १७० मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पेठ, लोणावळा आदी भागांत शंभर मिलिमिटरहून अधिक, तर मराठवाड्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड आदी भागांत १५० ते १८० मिलिमिटर पाऊस नोंदिवला गेला. विदर्भातील भाम्रागडमध्ये १४० मिलिमीटर पाऊस झाला.
पाऊसमान…
- मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांत पुढील पाच दिवस काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत १०, ११ जुलैला, तर पालघरमध्ये ११ जुलैला अतिवृष्टीचा इशारा आहे.
- सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत मुसळधारांचा अंदाज आहे.
- पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागात १०,११ जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
- औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज आहे.
- विदर्भात सर्वच ठिकाणी आणि प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांत मुसळधारांची शक्यता आहे.