पुणे : मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याने येत्या तीन दिवसांत पाऊस पुणे आणि मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तवला.मोसमी वारे अद्याप तळकोकणातच आहेत, मात्र त्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने तीन दिवसांत पाऊस राज्याच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात ११ जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी सोमवारी (१९ जून) सायंकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती, मात्र त्यांची पुढीलवाटचाल सुरू होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, देशाच्या अन्य भागांत मोसमी वाऱ्यांनी सोमवारी प्रगती केली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरित भागात मोसमी वारे दाखल झाले आहेत.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढील पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.सोमवारी राज्यात सर्वाधिक ४२.४, अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे ते लवकरच पुढे वाटचाल करतील. पुढील तीन दिवसांत मोसमी वारे पुणे आणि मुंबईत दाखल होतील. विदर्भ आणि मराठवाडय़ात मोसमी वारे दाखल होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.- डॉ. अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ, हवामान विभाग

Story img Loader