पुणे : मोसमी पाऊस रविवारी (२ जून) कर्नाटक, आंध्र प्रदेशात दाखल झाला. पावसाने केरळ, तमिळनाडू पूर्णपणे व्यापले असून, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातही मोसमी पावसाची आगेकूच सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झालेला पाऊस शनिवारपर्यंत (१ जून) केरळमध्येच स्थिरावला होता. रविवारी मोसमी वाऱ्यांनी केरळ, तमिळनाडू व्यापून पुढे दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेश, त्रिपुरातील काही भाग वगळता संपूर्ण ईशान्य भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन-तीन दिवसांत मोसमी पाऊस उर्वरीत कर्नाटक व्यापून आणखी पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>बारावीनंतरच्या डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर, पहिली गुणवत्ता यादी कधी?

राज्यभरातील तापमानात घट

विदर्भासह राज्यभरातील तापमानात घट झाली आहे. यवतमाळचा अपवाद वगळता विदर्भात रविवारी पारा सरासरी ४२ अंशांवर राहिला. रविवारी यवतमाळमध्ये राज्यात सर्वाधिक ४५.०, वाशिममध्ये ४२.६, नागपूरमध्ये ४१.८, चंद्रपुरात ४३.४, अमरावतीत ४२.६ आणि अकोल्यात ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात परभणी ४०.५, धाराशिव ३९.४, नांदेड ४१.२ आणि औरंगाबादमध्ये पारा ३९.५ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४०.६, जळगाव ४०.८, मालेगाव ४२.४ आणि पुण्यात ३६.६ अंश होते. किनारपट्टीवर कुलाब्यात ३५.२ आणि रत्नागिरीत ३४.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains in karnataka andhra pradesh amy