पुणे : मोसमी पाऊस गुरुवारी (६ जून) राज्यात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात मोसमी पावसाचे आगमन झाले. शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाने गुरुवारी रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूरपर्यंत मजल मारली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, पुढील तीन दिवसांत पाऊस मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंत धडक देण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित, जलसंपदा विभागाकडून धरणांची तपासणी
गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा वेगाने पुढे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शनिवारपासून (९ जून) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, मुंबई आणि पश्चिम घाटाच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.
तळकोकणात एक दिवस अगोदर आगमन
मोसमी पाऊस सरासरी पाच जून रोजी गोव्यात आणि सात जून रोजी तळकोकणात दाखल होतो. यंदा एक दिवस अगोदरच पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे. पुण्यात सरासरी १० आणि मुंबईत ११ जून रोजी पाऊस दाखल होतो. यंदा पुणे आणि मुंबईतही नियोजित वेळेपूर्वीच मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागानेही कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसासाठी नारंगी इशारा दिला आहे.
हेही वाचा : भाजपसाठी कोथरूड नवे ‘सत्ताकेंद्र’, ‘कसब्या’ची मक्तेदारी संपुष्टात
राज्यात मोसमी पाऊस दाखल झालेल्या तारखा
२०२४ – ६ जून
२०२३ – ११ जून
२०२१ – ५ जून
२०२० – ११ जून
२०१९ – २० जून