पुणे: राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा सात दिवस उशिराने २४ सप्टेंबरपासून माघारीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर एक दिवस २४ सप्टेंबरपर्यंत माघारीचा प्रवास सुरू राहिला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. त्यानंतर दोन तारखेला पुन्हा काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला, दोन ऑक्टोबरपर्यंत मोसमी पावसाने लेह, लडाख, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली होती. चार ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. आज, शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी आणखी काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. संपूर्ण गुजरात, उत्तराखंडसह मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. राज्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.
महाराष्ट्रातून माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातून सरासरी पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेत मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अगदीच माघारीचा प्रवास लांबला तर १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान विभागाने रविवारी (६ ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.