पावसाला घेऊन येणारे मोसमी वारे अर्थात नैर्ऋत्य मान्सून दोन दिवस आधीच अंदमान समुद्र, अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल झाले. त्यांच्या पुढील सरकण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
मान्सून दाखल होण्याआधीच अंदमान-निकोबार बेटांवर पाऊस सुरू होता. येत्या दोन दिवसांतही तिथे काही ठिकाणी मोठय़ा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून सामान्यत: २० मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. या वेळी तो रविवारी म्हणजे दोन दिवस आधीच तिथे पोहोचला. त्याच्या पुढच्या प्रवासासही अनुकूल वातावरण आहे. मान्सून येथे वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने (५ जून) पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता त्याचा पुढचा प्रवास कसा होणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, सध्या मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाचे वातावरण आहे. पुणे, इचलकरंजी, सांगलीसह काही ठिकाणी रविवारी वादळी पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत तो इतरत्र पडण्याची शक्यता आहे. इथे पावसाचे वातावरण असले, तरी बिहार, पश्चिम बंगालमधील गंगेचे क्षेत्र, ओडिशा या भागात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.