पुणे : भारतासाठी हक्काचा पाऊस असलेल्या मोसमी पावसाच्या परतीचे वेध आता लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने जाहीर केल्यानंतर पुढील दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतातील काही राज्यांतून मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून तो त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी माघारी फिरू शकतो.
सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे. पुढील तीन ते चार दिवस प्रामुख्याने विदर्भात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांच्या कडकडाटात पावासाची शक्यता आहे. मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने सर्वात शेवटी २ जुलैला पश्चिम राजस्थानाच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. त्यानंतरच्या कालावधीत देशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कमी दाबाच्या पट्टय़ांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने मध्य भारत आणि दक्षिणेकडील बहुतांश भागात यंदा मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसला. या विभागांत सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पाऊस आहे. महाराष्ट्रात मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.
पश्चिम राजस्थानमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोसमी पाऊस परत फिरण्याची चिन्हे आणि पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम राजस्थानसह पंजाब, हरियाणा आणि कच्छ भागांत सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजस्थानसह, पंजाब, हरियाणा, कच्छ आदी भागांतून मोसमी पाऊस पुढील दोन दिवसांत मागे फिरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागांत पाऊस होईल. ओडिसा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, छत्तीसगड आदी राज्यांतही पावसाचा अंदाज आहे.
पाऊस कोणत्या जिल्ह्यांत?
महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आदी भागांत २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कमी राहील.