पुणे : भारतासाठी हक्काचा पाऊस म्हणून ओळख असलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (२० सप्टेंबर) जाहीर केले. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने सर्वांत शेवटी २ जुलैला पश्चिम राजस्थानाच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. त्यानंतरच्या कालावधीत देशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कमी दाबाच्या पट्ट्यांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने मध्य भारत आणि दक्षिणेकडील बहुतांश भागात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसला. या विभागांत सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पाऊस आहे. महाराष्ट्रात मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
हेही वाचा >>> आरोग्य विभाग गट क अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया स्थगित
दक्षिण- उत्तर राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून निर्माण झालेली कोरड्या हवामानाची स्थिती, कमी झालेली आर्द्रता आणि आणि वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल लक्षात घेऊन या विभागासह कच्छ भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख १७ सप्टेंबर असते. त्यानुसार यंदा तो तीन दिवस उशिराने परत फिरला आहे. राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा परतीचा प्रवास साधारणतः दहा ते पंधरा दिवसांनी होतो. त्यानुसार महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> ‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण
गतवर्षीपेक्षा सोळा दिवस आधी माघारी
राजस्थानमधून मोसमी पाऊस सर्वसाधारण वेळेनुसार १७ सप्टेंबरला माघारी फिरतो. मात्र गतवर्षी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी त्याला १९ दिवसांचा उशीर झाला होता. ६ ऑक्टोबरला त्याने परतीचा प्रवास सुरू केला होता. त्या तुलनेत यंदा तो १६ दिवस आधीच परतीच्या प्रवासावर निघाला आहे. गतवर्षी महाराष्ट्रातून १५ ऑक्टोबरला, तर देशातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यामुळे एकूण देशातच मोसमी पावसाचा कालावधी लांबला होता.
हेही वाचा >>> लम्पीच्या लसीकरणासाठी खासगी पशुसंवर्धन पदवीधारकांची मदत
राज्यात पावसाची शक्यता
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतानाच सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने विदर्भात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिसा, छत्तीसगढ मध्य प्रदेश आदी राज्यातही पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.