मान्सूनचा देशातील मुक्काम गेल्या चार-पाच वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा लांबला. राजधानी दिल्लीमध्ये तर त्याने यंदा गेल्या सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका दीर्घ मुक्काम केला, हा मुक्काम संपवून तो गुरुवारी तो दिल्लीतून माघारी परतला. दरम्यान, दसऱ्याला महाराष्ट्रात बसरलेला पाऊस दिवाळीत कायम राहण्याची शक्यता कमी असून, येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातूनही त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
या वर्षी मान्सूनचे केरळातील आगमन वेळेवर म्हणजे १ जून रोजी झाले खरे, पण तो भारतातून बाहेर पडणार का, अशी शंका यावी इतका काळ तो देशात रेंगाळला. त्याच्या परतीच्या प्रवासाला वेळापत्रकापेक्षा एक आठवडा उशिराने म्हणजे ९ सप्टेंबरला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र त्याचा प्रवास अतिशय संथगतीने झाला. दिल्ली येथे त्याने १६ ऑक्टोबपर्यंत मुक्काम ठोकला होता. गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात हा त्याच्या मुक्कामाचा उच्चांक आहे. यापूर्वी १९५६ साली तो उशिरात उशिरा १३ ऑक्टोबर रोजी दिल्लीतून बाहेर पडला होता. यंदा त्याने हा विक्रमही मागे टाकला आणि तो गुरुवारी म्हणजे १७ ऑक्टोबरला दिल्लीतून बाहेर पडला. विशेष म्हणजे गेली सलग पाच वर्षे मान्सूनला देशातून बाहेर पडण्यास विलंब झालेला आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारीही अनेक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या शनिवापर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने दिला आहे.
दिवाळीपर्यंत मुक्काम नाही
मोसमी वाऱ्यांनी आणि पावसाने दसऱ्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकला होता. तो दिवाळीपर्यंत काम राहणार का, अशी उत्सुकता होती. मात्र, तशी शक्यता नाही. कारण येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यातून परतीचा प्रवास सुरू करेल आणि पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातून मुक्काम हलवेल. त्यामुळे तो दिवाळीपर्यंत राज्यात कायम राहण्याची शक्यता नाही, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader