पावसाला घेऊन येणारे नैर्ऋत्य मोसमी मारे (मान्सून) अंदमान समुद्रात वेळेआधी दाखल झाले असली तरी त्यांचा पुढील प्रवास लांबण्याची शक्यता आहे. नेहमीच्या १ जून या तारखेऐवजी मान्सून ५ जून रोजी केरळात दाखल होईल, असा ताजा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या तारखेचा अंदाज २००५ सालापासून दिला जातो. हवामान विभागाने जाहीर केलेली तारीख चार दिवसांनी पुढे किंवा मागे होऊ शकते, अशी या अंदाजाची मर्यादा आहे. मान्सूनच्या आगमनाचा अंदाज गेल्या नऊ वर्षांमध्ये चुकलेला नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे. या वर्षी मान्सून १७ मे रोजी म्हणजे नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच अंदमान समुद्रात दाखल होण्यास अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला. त्यामुळे त्याचे केरळमधील आगमन लवकर होणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, गुरुवारी हवामान विभागाचा ताजा अंदाज जाहीर झाला. त्यानुसार, मान्सून ५ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख १ जून अशी आहे. त्यामुळे यंदा त्याला चार दिवस उशीर होण्याचा अंदाज आहे.