देशावर यंदा दुष्काळाची छाया; ८८ टक्के पावसाचा सुधारित अंदाज
नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) भारताच्या मुख्य भूमीतील आगमन लांबलेले असतानाच हवामान विभागाने आणखी एक वाईट बातमी जाहीर केली आहे. पावसाचा सुधारित अंदाज मंगळवारी जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार या वर्षीच्या पावसाळय़ात सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ देशावर दुष्काळाचे सावट असेल. प्राथमिक अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या ‘एल-निनो’ या घटकाचा या पावसाळय़ात प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत हवामान विभागातर्फे मंगळवारी सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. त्यात म्हटले आहे, की विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एप्रिल महिन्यापासून ‘एल-निनो’चा हलका प्रभाव होता. भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संस्था (आयआयटीएम) यांच्या निरीक्षणानुसार पावसाळय़ाच्या हंगामात ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसावर एल-निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता तब्बल नव्वद टक्के इतकी जास्त आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण आणखी घटण्याची चिन्हे आहेत. या वर्षी ८८ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यात कमी किंवा अधिक असा चार टक्क्यांचा फरक पडू शकतो.
शेतीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील पावसाचा अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार देशात जुलै महिन्यास सरासरीच्या ९२ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध उपविभागांमध्ये किती पाऊस पडेल याबाबतही या अंदाजात भाष्य करण्यात आले आहे. त्यानुसार पंजाब, हरयाणासह वायव्य भारतात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ८५ टक्के पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात सरासरीच्या ९० टक्के, ईशान्य भारतात ९० टक्के, तर दक्षिण भारतात ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट
हवामानशास्त्रीय निकषानुसार देशाच्या पातळीवर सरासरीच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यास ते वर्ष दुष्काळी मानले जाते. देशात गेल्या वर्षी ८८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ते दुष्काळी वर्ष ठरले. त्यापाठोपाठ आता या वर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट आहे. नवे सहस्रक सुरू झाल्यापासून गेल्या १५ पैकी चार वर्षे दुष्काळी ठरली आहे. त्यात २००२ (८१ टक्के पाऊस), २००४ (८७ टक्के), २००९ (७८ टक्के) आणि २०१४ (८८ टक्के) या वर्षांचा समावेश आहे.
भांडवली बाजारात पडझडीचे वादळ
यंदा कमी मान्सून होण्याच्या नव्या अंदाजाने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात तब्बल ६५० हून अधिक अंशांनी खाली येत थेट २७ हजारांवर येऊन ठेपला.
निफ्टीने ८२००चा स्तर
गाठला. व्याजदराशी निगडित समभागांमध्ये मूल्य ऱ्हास दिसून आला. गेल्या दोन दिवसांत कमावलेली निर्देशांक झेप यामुळे एकाच व्यवहारात रोडावली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्तीही २.६१ लाख कोटींनी कमी झाली.