लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यातच पावसासाठी पोषक अशी कोणतीही हवामान प्रणाली राज्यावर सक्रिय नाही. मात्र, ४ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात वाऱ्याची एकचक्रीय स्थिती तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनुकूल स्थिती निर्माण होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
संपूर्ण ऑगस्टमध्ये मोजकेच दिवस पाऊस पडल्याने राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. विशेषत: सांगली आणि जालना जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती ओढवली झाली आहे. पाऊस नसल्याने शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा-पुणे: पिंपरीत लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन पथके
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. हवेत पुरेशी आर्द्रता असल्याने काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच ४ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात वाऱ्याची एकचक्रीय स्थिती तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन पावसाची शक्यता वाढली आहे. कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवसांत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची, त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.