लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. १८ ते २० ऑगस्ट या काळात संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयाच्या पायथ्याला असलेला मोसमी पावसाचा आस दक्षिणेकडे सरकत आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरावरून विदर्भ, मराठवाड्याकडे येण्याची शक्यता आहे. १८ ते २० ऑगस्ट या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा- खळबळजनक! टोळक्याकडून तरुणाचा खून; हल्लेखोरांनी काही तरुणांच्या हाताची बोटे छाटली
महाबळेश्वरात २५ मिमी पावसाची नोंद
मागील २४ तासांत विदर्भात पावसाने उघडीप दिली. चंद्रपुरात २.६ आणि गडचिरोलीत २ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात उदगीरमध्ये ११, तर परभणीत २.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापुरात ४.८, साताऱ्यात १, नाशिकमध्ये ०.८ आणि महाबळेश्वरात २५ मिमी पाऊस झाला आहे. किनारपट्टीवर हर्णेत १.८, कुलाब्यात १.६ आणि रत्नागिरीत १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.