लोकसत्ता वार्ताहर
नारायणगाव : क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतिक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने याठिकाणी ‘मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक’ उभारावे अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याबरोबर कुणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी तरुणाईला केले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण कलुषित होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंग्याच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये या भूमिकेशी सहमती दर्शवताना खासदार डॉ. कोल्हे यांनी जो कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची अवस्था ‘हीच’ होईल, हे दाखवून देणारी ही कबर आहे, असे ठासून सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेबा आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधव व अठरापगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल २७ वर्षे औरंगजेबाला दख्खनमध्ये टाचा घासायला लावल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य धुळीस मिळविण्यासाठी आलेल्या औरंग्याला इथेच मूठमाती दिली. त्याचे प्रतिक ही कबर आहे. म्हणूनच ‘मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक’ या ठिकाणी उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
या संदर्भात जारी केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका’ असे कळकळीचे आवाहन तरुणाईला केले आहे. ते पुढे म्हणाले की, सत्ता येते-जाते, राज्यकर्ते येतात-जातात, बदलतात पण एकदा का केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर या केसेस पायी तुमच्या करिअरची राखरांगोळी होऊ शकते. तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण केलं, तुमच्या करिअरची स्वप्नं पाहिली. त्या करिअरच्या स्वप्नांना, आईवडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.