निष्ठेने काम केल्यास अडचणी येत नाहीत आणि आल्याच तरी त्या दूर करण्यासाठी अनेक हात सरसावतात, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी चिंचवडला व्यक्त केली. माणूस हिंस्र बनत चालला आहे. दुसरीकडे हिंस्र मुकी जनावरे मात्र प्रेमाने वागताना दिसतात, अशी सूचक टिप्पणी त्यांनी यावेळी केली. डॉ. आमटे यांनी राजकारणात यावे, अशी इच्छा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
चिंचवड देवस्थान आयोजित मोरया महोत्सवात ‘सकाळ’ चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांना जीवनगौरव तर डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह डॉ. प्र.चिं. शेजवलकर, चारूदत्त आफळे, जुगल राठी, देवदत्त कशाळीकर, पै. अमोल बोराटे, सतीश गोयेकर, घनपाठी दंडगे, शमशेर केळशीकर, कु. दुर्वा गणेश मिरजकर, विजय भोसले यांना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते मोरया पुरस्काराने गौरवण्यात आले, यावेळी खासदार गजानन बाबर, शिर्डी देवस्थानचे जयंत ससाणे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, अश्विनी चिंचवडे, आशा सूर्यवंशी, सुनंदा गडाळे व देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
वळसे म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये सध्या प्रचलित असलेली शिक्षण पध्दती बदलली पाहिजे व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण कुठे आहोत, हे तपासून पाहण्यासाठी सर्व संबंधित घटकांना एकत्र आणले पाहिजे. तेंडुलकर यांनी, राजकारणी माझे अन्नदाते आहेत, ते रोज पुरेसे विषय देतात अन्यथा देवळासमोर थाळी घेऊन बसण्याची वेळ आली असती, अशी मिश्कील टिप्पणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा