‘राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थे’ला (एफटीआयआय) स्फोटकांसह नुकत्याच आलेल्या धमकी पत्राच्या पाश्र्वभूमीवर संस्थेच्या आवाराचे व्यावसायिक संस्थेकडून सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्तांशी ‘त्या’ पत्राबाबत चर्चा करून संस्थेच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथील सुरक्षा व्यवस्थेस काही विशिष्ट सूचना (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) देण्यात आल्याची माहिती संचालक भूपेंद्र केंथोला यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ते म्हणाले,‘संस्थेच्या आवाराचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे ठरवण्यात आले आहे. सध्या संस्थेत ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु पूर्ण आवारासाठी ते पुरेसे नाहीत. आणखी किती ठिकाणी कॅमेरे बसवणे आवश्यक आहे आणि एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने काय करायला हवे याचा सल्ला हा सुरक्षा लेखापरीक्षणात घेतला जाईल. कन्हैय्या कुमारच्या झालेल्या पुणे भेटीत तो एफटीआयआयला भेट देणार की नाही याची चर्चा रंगली होती, परंतु ही भेट झाली नव्हती. त्यानंतरच स्फोटकांच्या पत्राचे प्रकरणही घडले. बाहेरील व्यक्तींना बोलावण्याबाबत प्रशासनाचा निर्णय काय असेल, असा प्रश्न विचारला असता केंथोला म्हणाले,‘ गेल्या आठवडाभरात असा कोणताही प्रश्न समोर आलेला नाही. विद्यार्थ्यांचेही प्रकल्प, अभ्यास सुरू आहे. वादग्रस्त व्यक्तीस बोलावण्यात आले तर त्याबाबत विद्यार्थी संघटनेशी चर्चा करू.’

भाषणात दारू, अमली पदार्थ व रॅगिंगचा विषय!
केंथोला यांचे गुरुवारी प्रथमच विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसमोर भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेतील शिस्तीचा विषय काढला. याबाबत केंथोला म्हणाले,‘विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच दारू आणि अमली पदार्थापासून दूर राहणे गरजेचे आहे. तसेच जुलैत येणाऱ्या प्रथम वर्षांच्या मुलांचे रॅगिंग नाही झाले पाहिजे, या गोष्टींबाबत मी बोललो. विद्यार्थ्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व कोणीही मला भाषणाच्या मध्ये थांबवले नाही. कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यलयात येण्याबाबतही चर्चा झाली. कोणत्याही संस्थेसाठी शिस्त आवश्यक असते, पण ती एका रात्रीत येणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल.’

Story img Loader