दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावासामुळे पुणे शहारातील मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्राच्या बाहेर पाणी वाहू लागल्याने, नदीकाठच्या पाचशे रहिवाशांना महानगर पालिकेच्यावतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

खडकवासला, पानशेत व वरसगाव धरण शंभर टक्के भरले असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शहरातील भिडे पुल तर केव्हाच पाण्याखाली गेला असल्याने शहारतील अन्य मार्गांवर वाहनांची कोंडी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील एकूण ६२५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पाण्यामुळे बाधीत झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्यइमारतीत  तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.

स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची संख्या व त्यांना राहण्यास दिलेली ठिकाणं –
१) आदर्शनगर, बोपोडी, २६० कुटुंब – राजेंद्र प्रसाद शाळा
२) शांती नगर येरवडा, ३०० कुटुंब- परुळेकर शाळा
३) कामगार पुतळा, १३ नागरिक- दहा नंबर शाळा
४) पाटील इस्टेट, पाच कुटुंब – घोले रस्ता पीएमसी काॅलनी शाळा शिवाजीनगर
५) खिलारे वस्ती, ५० कुटुंब – उपाध्याय शाळा

सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या ११ वाजल्यापासून ३५ हजार ५७४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणातून अनुक्रमे १२ हजार ९३६ आणि ९ हजार ०३५ असा विसर्ग सुरु आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरालाही पावसाचा फटका बसला आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे जुन्या सांगवी परिसरात रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. या भागातले रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.

Story img Loader