एकीकडे मंदीचे वातावरण असताना निगडी-प्राधिकरण येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांना हिंजवडी येथील ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) कंपनीत नोकरी मिळण्याची किमया साधली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येकी शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना कंपनीने चांगल्या पगाराच्या नोक ऱ्या दिल्या आहेत.
मंदीची लाट असल्याने औद्योगिक क्षेत्रात त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत ‘पीसीसीओई’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याच्या बाबतीत सलग तीन वर्षे शतकांची हॅटट्रिक झाली आहे. २०११-१२ मध्ये १२३, त्यानंतर २०१२-१३ मध्ये १०१ आणि २०१३-१४ या आर्थिक वर्षांत १०४ विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीत नोकऱ्या मिळाल्या आहेत. मुलांमधील नैपुण्य व कंपनीला अभिप्रेत असलेले निकष पाहून ही निवड झाल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षी कंपनीच्या वतीने ८० मिनिटांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात सहभागी १८३ पैकी १६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची कंपनीच्या तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि मनुष्यबळ विभागाच्या वतीने तीन वेगवेगळ्या मुलाखती घेण्यात आल्या व १०४ विद्यार्थ्यांना कंपनीने नोकरीचे पत्र दिले, अशी माहिती महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, संचालक भाईजान काझी, पद्माताई भोसले, प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा